Friday, February 25, 2011

कोलंबी भात

साधारण पद्धत मला माहित नाही. पण गेली बरीच वर्ष मी ज्या पद्धतीने करतोय तो पद्धत देतो.

साधारण ४-५ माणसांसाठी
 
साहित्य: 
तांदूळ - ३ वाट्या
ताजी कोलंबी - सोललेली १.५ ते २ वाटी,
कांदे - २ उभे चिरलेले
आले - पाऊण इंच
लसूण - ६-७ पाकळ्या
हिरवी मिरची - ३ मध्यम आकाराच्या
कोथिंबीर - पाव वाटी चिरलेली
लाल तिखट - १ टी स्पून
हळद - १/२ टी स्पून
गरम मसाला पावडर - १.५ टी स्पून
बटाटे - २
टोमॅटो - १-२ मध्यम
तेल - ३ टेबल स्पून
मीठ - चवीनुसार
 
पूर्वतयारी:
१) ३ वाट्या तांदूळ २० मिनिटे भिजत ठेवून नंतर निथळत ठेवावे.
२) आले, लसूण, मिरची एकदम बारीक चिरून घ्यावे. अथवा एकत्रित पेस्ट करून घ्यावी.
३) बटाटे लांबट आकारात साधारण एकाच साईजचे कापून घ्यावेत.
४) टोमॅटो मध्यम आकारात चिरून घ्यावे.
५) पाणी ६.५ वाट्या मोजून घेणे व कडक गरम करून घेणे.
 
कृती: (कुकरसाठी)
१) मोठ्या कुकरमध्ये ३ टेबल स्पून तेल मध्यम तापवून घेणे.
२) तेल तापल्यावर उभा चिरलेला कांदा टाकून लाल रंगावर परतवून घेणे.
३) बारीक चिरलेली आले, लसूण, मिरची किंवा त्याची पेस्ट टाकणे व १ मिनिट परतल्यावर कोलंबी आणि बटाटे टाकणे. चवीप्रमाणे मीठ टाकणे व ३-४ मिनिटे झाकण ठेवून द्यावे.
४) वर दिलेल्या प्रमाणानुसार हळद, लाल तिखट टाकून अर्धा मिनिट परतणे. 
५) निथळून झालेले तांदूळ टाकणे व खरपूस परतून घेणे.  १.५ टी स्पून  गरम मसाला पावडर  टाकून साधारण १ मिनिट परतावे.
६) गरम केलेले ६.५ वाट्या पाणी टाकणे. एकदा नीट ढवळून घेणे.
७) उकळी येऊ लागल्यावर चिरलेला टोमॅटो टाकणे व झाकण बंद करणे.
८) मध्यम आचेवर १.५ शिट्टी द्यावी व गॅस बंद करावा.
९) १०-१५ मिनिटाने झाकण उघडून त्यात चिरलेली कोथिंबीर टाकावी व १० मिनिटे पुन्हा झाकून ठेवावे.

कोलंबी भात आणि सोलकढी ! झक्कास!!! :)